शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक २४ मधील रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसात करा, अन्यथा महापालिका शहर अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी, २२ नोव्हेंबर रोजी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना देण्यात आले.
प्रभाग क्रमांक २४ मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. गोविंदनगर, जुने सिडको, बडदेनगर, खोडे मळा, कोठावळे मळा, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, जगतापनगर, तिडकेनगर, बाजीरावनगर, पुष्पांजलीनगर, नवीन तिडके कॉलनी, भुजबळ फार्म, काशिकोनगर आदी संपूर्ण प्रभागातील लहान-मोठ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा, खडीकरण, दुरुस्ती करून डांबरीकरण करा, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहराच्या इतर भागात रस्ता दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असताना या प्रभागाकडे प्रशासनाकडून प्रामुख्याने बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
आठ दिवसांच्या आत रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करा, अन्यथा मंगळवार, २९ नोव्हेंबरपासून शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या दालनात नागरिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल. तेथे आंदोलन करू न दिल्यास रस्त्यात ठिय्या व रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, डॉ. राजाराम चोपडे, मनोज वाणी, डॉ. शशीकांत मोरे, दिलीप दिवाणे, श्रीकांत नाईक, विनोद पोळ, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, अशोक पाटील, दीपक दुट्टे, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, सुनीता उबाळे, रूपाली मुसळे, वंदना पाटील, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, प्रथमेश पाटील, हरिष काळे, तेजस अमृतकर आदींसह रहिवाशांनी दिला आहे.