नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाजीरावनगर येथे नंदिनी नदीवर पूल बांधून आर डी सर्कलपर्यंत २४ मीटर रूंदीचा रस्ता विकसित करा, कर्मयोगीनगर येथील पूलाचे काम त्वरित सुरू करा, पार्कसाठी आरक्षित असलेल्या चार एकर पैकी ताब्यात असलेल्या जागेवर विकासकाम सुरू करा, सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळ गोविंदनगरकडे जाणार्या पूलाचे रूंदीकरण करा यासह प्रभाग २४ मधील विविध मागण्या व समस्यांचे निवेदन शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना देण्यात आले. भूसंपादनाशी संबंधित व इतर विकासकामांसाठी सिंहस्थ निधीतून तरतूद करण्यात येईल, असे आयुक्तांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवारी, ६ ऑक्टोबर २०२२ रोजी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळील गोविंदनगरकडे जाणार्या रस्त्यावरील पूलाचे रूंदीकरण करा. गोविंदनगरला जाण्यासाठी इंडिगो पार्क समोरील नाल्यावरून १२ मीटर रस्ता, तसेच कर्मयोगीनगरहून बडदेनगर ते पाटीलनगर या रस्त्याला जोडणारा १८ मीटर रस्ता विकसित करा. आर डी सर्कल ते बाजीरावनगर हा सध्या आठ-दहा मीटर रस्ता अस्तित्वात आहे, तो २४ मीटर करा. बाजीरावनगर येथे नंदिनी नदीवर नवीन पूल बांधावा.
अंतर्गत व मुख्य रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करा. कर्मयोगीनगरच्या ब्लू बेल्सजवळील नाल्यावरील छोट्या पूलाचे प्रत्यक्ष काम सुरू करा. आर डी सर्कल ते बाजीरावनगर, आर डी सर्कल ते इंडिगो पार्क हे जॉगिंग ट्रॅक विकसित करावे. इंडिगो पार्क ते महामार्ग सर्व्हिस रोडपर्यंतच्या जॉगिंग ट्रॅकसाठीच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी. उद्यानांचे नूतनीकरण करावे. महापालिकेचे मोकळे भूखंड स्वच्छ करावेत. प्रभागात आवश्यक तेथे पावसाळी गटारी निर्माण कराव्यात. सभागृहांची दुरूस्ती करावी. कर्मयोगीनगर येथे चार एकर क्षेत्र पार्कसाठी आरक्षित आहे, त्यापैकी ताब्यात असलेल्या क्षेत्रावर पार्कचे काम सुरू करावे. बंद झालेली रात्रीची घंटागाडी पुन्हा सुरू करावी, या मागण्या करण्यात आल्या.
यासंदर्भात संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी दौरा करतील. कर्मयोगीनगर येथील पूलाचे काम सुरू करण्यात येईल. रस्त्यांचे डांबरीकरणाचे कामही पाऊस थांबल्यानंतर करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. भाडेकराराने दिलेल्या उद्यानाची देखभाल, दुरुस्ती करण्याच्या, तसेच करारातील अटी-शर्थी पाळण्याच्या सूचना गोविंदनगर येथील न्यू ईरा स्कूलला देण्यात येतील. संध्या-छाया ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाच्या समस्या सोडविण्यात येतील. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगिता देशमुख, सुनीता उबाळे, अशोक पाटील, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, नितीन रसाळ, बापुराव पाटील, चिंतामण सावकार, दिलीप निकम, कृष्णाजी विसाळे, डॉ. प्रकाश हिरण, दिलीप जगताप, डॉ. मनीष तोलानी, डॉ. प्रताप कोठावळे, डॉ. प्रदीप भंडारी, बासू दंडवाणी, सुनील पहिलाजानी, सखाराम देवरे, बाळासाहेब देशमुख, अशोक पालवे, ओमप्रकाश शर्मा, अशोक देवरे यांच्यासह रहिवाशी हजर होते.