आदिवासी शेतकरी हवालदिल..
..
नाशिक: आदिवासी विकास महामंडळाने धान्य खरेदी अंतर्गत भात खरेदी करून पाच सहा महिने उलटले तरी अद्याप आदिवासी शेतकऱ्यांना पैसे अदा न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.या विलंबाबद्दल विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महामंडळाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित पेमेंट अदा करण्याच्या सूचना केल्या आहे.
आदिवासी विकास महामंडळातर्फे एकाधिकार धान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यभर भाताचे उत्पादन होणाऱ्या राज्यभरातील आदिवासी भागात भात (धान) खरेदी केली जाते. यंदाही हजारो टन धान खरेदी राज्यभर महामंडळातर्फे करण्यात आली आहे. भात खरेदी होताच सात दिवसात संबंधित शेतकऱ्यांचे बँक खात्यात पेमेंट करण्याची तरतूद आहे. मात्र सदर खरेदी होऊन पाच सहा महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना पैसे अदा केलेले नाही. विशेष म्हणजे पेमेंट अदा करण्याबाबत आर्थिक तरतूद होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप पेमेंट अदा झाले नसल्याची बाब समोर आली आहे.
याबाबत मंगळवारी विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधता आढावा घेत पेमेंट विलंबाबाबत विचारणा केली असता कोरोनामुळे सदर पेमेंट अदा करण्यास विलंब झाल्याचे सांगत लवकरच पेमेंट अदा करण्यात येईल असे सांगितले आहे. दरम्यान सदर खरेदी भात साठविण्यासाठी घेतलेले गोदामाचे भाडे दोन वर्षांपासून तर हमालांचे पेमेंटही अदा केले नसल्याच्याही तक्रारी आहे. तसेच सदर खरेदी केलेल्या भाताची विक्रीही वेळेवर केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात घट होत नुकसान होत आहे. सदर विभागातर्फे खरेदी केलेल्या भाताचे वेळेत पेमेंट मिळत नसल्याने शेतकरी महामंडळास भात विक्री करण्यास उदासीन असून खाजगी व्यापारी यांना बेभावात भात विक्री करत असून सर्व खरेदी केंद्र ओसाड पडत आहे.
कारणे अनाकलनीय आहे
अगोदरच कोरोनाच्या संकटाने शेतकरी बेजार झाले असून वेळेत पेमेंट न मिळाल्याने आदीवासी बांधवांचे मोठे हाल होत असून खरीप हंगाम सुरू होत असल्याने तात्काळ पेमेंट होण्याची गरज आहे. आदिवासी महामंडळाने शेतकऱ्यांच्या भात खरेदीचे पैसे अदा करण्यास केलेला विलंब व त्यासाठी दिली जाणारी कारणे अनाकलनीय असून महामंडळाने कारभार सुधारावा वेळीच भात खरेदी विक्री करावी शेतकऱ्यांचे पेमेंट,गोदामाचे भाडे हमालांची हमाली लवकरात लवकर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
आमदार नरहरी झिरवाळ, विधानसभा प्रभारी अध्यक्ष