नाशिक – कालिका पार्कसह प्रभाग क्रमांक ३० मधील धोकादायक उघड्या डीपी, मिनी पिलर यांची त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने महावितरण कंपनीला दिला आहे. प्रभाग क्रमांक ३० मध्ये विविध ठिकाणी महावितरणच्या डीपी उघड्या आहेत, मिनी पिलर नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, पावसाळ्यात तो अधिक वाढेल. तिडकेनगर, कालिका पार्क, गोविंदनगर, कर्मयोगीनगर, बडदेनगर, काशिकोनगर, जुने सिडको, भुजबळ फार्म परिसर, बाजीरावनगर, नवीन तिडके कॉलनी, पुष्पांजलीनगर या भागात महावितरणने पहाणी करावी. कालिकानगरच्या जय पार्क येथील मिनी पिलरमधून चाळीसहून अधिक घरांना विद्युत पुरवठा केला जातो, तेथील बॉक्स गेल्या दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे. याबाबत रहिवाशांनी दोनवेळेस महावितरणला निवेदने दिली, अनेकदा पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी येथेच चोवीस तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या प्रयत्नानंतर महावितरणने नवीन केबल टाकून हा पुरवठा पूर्ववत केला. पत्रा सडल्याने तोच मिनी पिलरचा बॉक्स पूर्णपणे निकामी झालेला आहे. धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हीच स्थिती कालिका पार्कच्या साईराम रो-हाऊस येथील विनोद पोळ यांच्या घराशेजारील मिनी पिलरची आहे. या समस्यांची त्वरित दखल घेवून दुरुस्तीच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, सुधीर वाघ, विठ्ठल देवरे, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब दिंडे, श्रीकांत नाईक, पी. एन. जाधव, जी. डी. देशमुख, बी. आर. सोनवणे, अशोक पाटील, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, मीना टकले, शीतल गवळी, संजय टकले, मगन तलवार, तुकाराम सोनवणे, डॉ. राजाराम चोपडे, बापुराव पाटील, चतुर नेरे आदींसह रहिवाशांनी दिला आहे.