नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक शहरातील सराफ बाजार, मरिमाता परिसर, रामकुंड, सरदार चौक, चिंचबन व अमरधाम रोड येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या व्यावसायिकांना ५० हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या धनादेश वाटप करण्यात आले. नाशिक शहरातील एकूण ४०२ बाधित व्यावसायिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुदान मंजूर करण्यात आले असून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० बाधित व्यावसायिकांना धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार अनिल दौंडे, मंडल अधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी अरुण पाटील, संजय साळी, संजय कापडणीस, दिनेश आहेर यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते. नाशिक शहरात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे गोदावरी नदी परिसरातील दुकानदार, टपरी धारक, हातगाडी धारक यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून शासनास सादर करण्यात आले होते. त्यानुसार नाशिक शहरातील सराफ बाजार, मरिमाता परिसर, रामकुंड, सरदारचौक, चिंचबन व अमरधाम रोड येथील बाधित झालेल्या ४०२ व्यावसायिकांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यातील १० व्यावसायिकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित बाधित व्यावसायिकांना त्यांच्या मदतीचे वाटप त्यांच्या निवासस्थानी तसेच व्यावसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अनिल दौंडे यांनी दिली.