नाशिक – गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक ढोलच्या तालावर थिरकले, तर महिलांनी फुगड्यांवर फेर धरत आनंद लुटला. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी सकाळी गोविंदनगर परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. यात ७५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर सायंकाळी मुख्य कार्यक्रम संघाचे अध्यक्ष विजय कृष्णाजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्याप्रसंगी आमदार सिमा हिरे, सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, फेस्कॉमचे संघटक सचिव उत्तमराव तांबे, महेश हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी संघाच्या कार्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विवाहाला पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला. संघाचे सचिव ओमप्रकाश शर्मा यांनी प्रास्ताविक केले. अशोक पालवे यांनी सूत्रसंचालन केले. सुरूची भोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी संघाच्या उपाध्यक्षा स्नेहलता सोनवणे, सल्लागार भालचंद्र रत्नपारखी, संचालक बाळासाहेब देशमुख, सुधाकर तोरणे, साधना नागापूरकर आदी उपस्थित होते.