नाशिक – आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणी करीता यापूर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासाठी एकच कार्यालय कार्यान्वित होते. समितीतील प्रकरणांचा वाढता ओघ पाहता व लाभार्थ्यांच्या सोयी करिता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे दुसरे कार्यालय नाशिक २ सुरू करण्यात आले असल्याचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती नाशिक किरण माळी यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, शासनाने १३ सप्टेबर २०१९ च्या निर्णयान्वये सदर कार्यालय सुरू मान्यता प्राप्त असून, त्यानुसार १० जानेवारी २०२२ पासून नाशिक २ कार्यालय कार्यान्वित झाले आहे. या नविन समितीच्या कार्यक्षेत्रात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला, सिन्नर, हे तालुके व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
सबंधीत तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज तसेच सेवा विषयक पत्रव्यवहार करतांना सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक क्रमांक २, दुसरा मजला गडकरी चौक, आदिवासी विकास भवन, नाशिक ४२२००२ यांच्या नावे करावा, असे आवाहन सहआयुक्त किरण माळी यांनी केले आहे.