नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २००९ साली स्थापनेनंतर व २०१५ साली ट्रॅफिक एज्युकेशन पार्क सुरू केल्यासुन एक लाख, दोन लाख असे टप्पे पार करत नाशिक फर्स्टने ६ जानेवारी २०२५ रोजी ३ लाख प्रशिक्षणार्थींचा अजून एक मैलाचा दगड पार केला आहे. आजपर्यंत नाशिक फर्स्ट ने ३ लाख नागरिकांना मोफत रस्ता सुरक्षा प्रशिक्षण दिले आहे. यावेळी नाशिकच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले हे देखील उपस्थित होते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी ट्रॅफिक एज्युकेशन पार्क च्या कामकाजाची व स्थापनेपासूनच्या कार्याची सखोल माहिती घेतली व प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. सध्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना सुरू आहे. या महिन्यातच नाशिक फर्स्टने हा अजून एक मैलाचा दगड पार केला आहे हा देखील एक योगायोगच म्हणावा लागेल.
आपल्या मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी संस्था चालकांच्या दूरदृष्टि, नियोजन व निस्वार्थपणे सातत्याने रस्ता सुरक्षेचे उपक्रम राबविल्याबद्दल मन:पूर्वक आभार मानले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, नाशिक फर्स्ट च्या या कामामुळे भविष्यात समाजात चांगले चालक, पादचारी होण्यासाठी मोलाची मदत होईल. या उपक्रमामुळे परिवहन विभाग व पोलिस विभाग यांचा भार हलका होण्यास अत्यंत मोठया प्रमाणावर मदत झाली आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या व त्याचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रथम त्यांनी सांगितले की, ज्यावेळी दुचाकी वाहनावर आपल्या पालकांबरोबर जाता येताना त्यांना सक्तीने हेलमेटचा वापर करण्यास सांगणे व भविष्यात तुम्हीही करणे, जेंव्हा चारचाकी वाहनामध्ये तुम्ही प्रवास करता तेंव्हा सिटबेल्टचा वापर अवश्य करणे त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. पार्क मध्ये निरीक्षण करतांना त्यांनी तेथील सिग्नल, नियंत्रित चौक, अनियंत्रित चौक, वाहतूक बेट, ब्लॅक स्पॉट व ॲम्फीथिएटर ची पाहणी करून स्वच्छता व टापटिपीबाबत देखील कौतुक केले. ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये महाव्यवस्थापक राजू माने व कार्यकारी सचिव भिमाशंकर धुमाळ यांनी त्यांचे स्वागत केले.