नाशिक – गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात साकारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोट क्लबकडे नाशिकचे पर्यटक आता चांगलेच आकर्षित होऊ लागले आहेत. नाताळची सुट्टी आणि या सुट्टीला जोडून आलेल्या रविवार या दोन दिवसात सुमारे पाच ते सहा हजार पर्यटकांनी या बोट क्लब ला भेट दिली आहे. एका बाजूला धरणाचे अथांग पाणी तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य अशी पर्वतांची रांग. यामध्ये खासकरून, संध्याकाळच्या वेळी खुलून दिसणाऱ्या निसर्गसौंदर्यात वेगवेगळ्या थरारक राइडस घेऊन नाशिककर या बोट क्लबचा आनंद लुटताना दिसत आहेत. लेक सफारी लेक लक्झरिअस क्रुजींग, रीगल स्पीड बोट राईड, कयाकिंग, जेट्स स्काय, बंपर राइड बनाना राईड, व्हर्लपूल राईड, फ्लाईंग फिश असे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स आणि अँडवेंचरचे प्रकार इथे अनुभवता येतात. खास करून सूर्यास्ताच्या वेळी स्पेशल सन सेट क्रूज किंवा स्पेशल सन सेट सफारी ही इथल्या पर्यटनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच येथे प्रवेश दिला जात आहे. एमटीडीसीच्या या बोट क्लबचे व्यवस्थापक धीरज चोपडेकर आणि महाव्यवस्थापक डॉ. सारंग कुलकर्णी हे त्यादृष्टीने नियोजन करीत आहेत.