नाशिक – गेल्या २३ वर्षांपासून नाशिकच्या श्री क्षेत्र लहवित येथील हभप श्री आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टच्या विद्यमाने व देहूकर फडाच्या सहमतीने वारकरी पंथाच्या महाराष्ट्रातील अतिशय सेवाभावी व गौरवशाली व्यक्तींस दिला जाणाऱ्या ‘सदगुरु वै. हभप सोपानकाका देहूकर वारकरी पुरस्कार ‘ घोषित करण्यात आले आहे. यामध्ये आळंदी येथील संत प्रभूती वेदांताचार्य हभप डॉ. नारायण महाराज जाधव (२०२०) तर मुक्ताईनगर जळगाव येथील संत मुक्ताबाई संस्थांनचे अध्यक्ष हभप ऍड. रवींद्रजी पाटील (२०२१) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान पंढरपूर येथील कुंभार घाट परिसरातील श्री देहूकर वाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याप्रसंगी वितरित केले जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नाशिक येथील उद्योजक हभप गंगाधर जाधव यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या आपत्तीमुळे सन २०२० व २०२१ अशा दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्रितरित्या जाहीर करण्यात आले असून ५१ हजार रु. रोख स्मृतिचिन्ह ,मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. याशिवाय सिन्नरच्या घोरवड येथील मृदूंगाचार्य हभप निवृत्ती महाराज घोरवाडकर, पुणे येथील मृदंगमहर्षी हभप तुकारामजी भूमकर (सांप्रदायिक मृदूंग वादक पुरस्कार ), बीड येथील भजनसम्राट हभप शाम महाराज पवार, इगतपुरी येथील संगीत अलंकार हभप रोहिदास महाराज मते ( वारकरी चाली पुरस्कार ) यांसह उस्मानाबाद येथील हभप गंगाधर कृष्णा घोटकर महाराज तर सोलापूर येथील हभप भगवान गणपत सांगोलकर महाराज ( देहूकर महाराज फड पुरस्कार ) या सहा मान्यवरांस प्रत्येकी २५ हजार रु.रोख स्मृतिचिन्ह व महावस्त्र पंढरपूर येथील हभप श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संतवीर हभप बंडा तात्या कराडकर तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, देहूकर फडाचे हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर, हभप चैतन्य महाराज देगूलकर, देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे आदींसह फडप्रमुख, दिंडीप्रमुख, वारकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.