नाशिक – भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी वय कमी दाखवण्याचा प्रकरणाचा पर्दाफाश मिलिटरी इंटेलिजन्स देवळाली कॅम्प, एलसीबी अहमदनगर, आणि पाथर्डी पोलिस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करुन केला आहे. या प्रकरणात दोन एजंटला गजाआड केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली कॅम्प येथील मिलिटरी इंटेलिजन्स ऑफिसला मुले स्वतःचे वय कमी करून भारतीय सैन्य दलामध्ये भरती होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. या चौकशीत त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या तालुक्यामध्ये अनेक डुप्लिकेट एज्युकेशन संस्था असल्याचे कळाले. येथे मुलांकडून ३५ हजार रुपये घेऊन मुलांना इयत्ता दहावीच्या वर्गात एक्सर्टनल कॅटिंडेट म्हणून अॅडमिशन करुन घेतले जाते. त्यानंतर दहावीच्या निकालामध्ये त्याचे वय कमी दिसून येते. त्या निकालाच्या आधारे जास्त वयाची मुले कमी वयाची बनून आर्मी मध्ये भरती होतात.
ही माहिती मिळाल्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्स देवळाली कॅम्प, एलसीबी अहमदनगर, आणि पोलिस स्टेशन पाथर्डी यांनी संयुक्त कारवाई करून दोन मुख्य एजंटला गजाआड केले आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या शाळेचे एलसी दाखले, एलसी बनवण्यासाठी वापरले जात असलेले डुप्लिकेट स्टॅम्प, कॉम्प्युटर, स्कॅनर मशीन, आधार कार्ड बनवण्याची सामग्री, मुलांची हिशोबाची वही जप्त केले असून या प्रकरणाची आता सखोल चौकशी केली जात आहे.