नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पाणी टंचाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केल्यानंतर महापालिका पाणी पुरवठा विभाग खडबडून जागा झाला आहे. उंटवाडीतील दोंदे पुलाखाली मुख्य जलवाहिनी फुटल्याचे शोधण्यात आले आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवार, दि. ६ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.
कर्मयोगीनगर, जगतापनगर, उंटवाडी, प्रियंका पार्क, कालिका पार्कसह प्रभाग २४च्या काही भागात सिडकोतील पवननगर येथील जलकुंभावरून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून या भागात अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. रहिवाशांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागते. याच्या निषेधार्थ सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली कर्मयोगीनगर येथील जलकुंभावर दोनवेळा आंदोलन करण्यात आले. आयुक्त मनीषा खत्री यांना भेटून निवेदन देण्यात आले.
त्रिमूर्ती चौकातील व्हॉल्व्ह खोलून अज्ञात व्यक्ती दुसरीकडेच पाणी सोडत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर व्हॉल्व्हच्या चाव्यांचे ठिकाण संबंधित अधिकार्यांनी बदलले. दिव्या अॅडलॅबजवळील फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली, तरीही पाणी पुरवठ्यात सुधारणा होत नव्हती. या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा आग्रह बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी अधिकार्यांकडे धरला.
पवननगर जलकुंभात पाणी नेणारी मुख्य जलवाहिनी उंटवाडीतील दोंदे पुलाखाली फुटल्याचे शोध मोहिमेत आढळले. येथून लाखो लिटर पाणी नंदिनी नदीत वाहून जात आहे, यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही पाईपलाईन त्वरित दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. बुधवार, दि. ६ ऑगस्टपासून दुरुस्तीचे हे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे.
दुरुस्तीचे काम हाती घेतल्याबद्दल सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, संगीता देशमुख, वंदना पाटील, सविता देवरे, नंदिनी जाधव, भारती चौधरी, मनीषा जोशी, नीलिमा चौधरी, गीता येवला, सरोज रसाळ, प्रतिभा वडगे, रेखा भालेराव, ज्योत्स्ना जाधव, चारुशीला पत्की, वृषाली तिडके, कलावती तिडके, जयश्री मगर, पौर्णिमा पेंढारकर, विशाखा थोरात, दिप्ती काळे, सिंधुताई मिंधे, मेघा तायडे, जया भंडारे, साधना महाले, किरण काळे, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. धनराज चौधरी, डॉ. राजाराम चोपडे, दिलीप येवले, शांतीलाल पवार, शामकांत शुक्ल, सुपडू बढे, लक्ष्मीकांत गर्गे, गजेंद्र मुळे, मनोज अट्रावलकर, महेश जाधव, प्रभाकर वाकसर, तुकाराम सोनवणे, दीपक दुट्टे, राजेंद्र पाटील, आनंद थोरात, राम भंडारे, संग्राम देशमुख, बाळासाहेब पेंढारकर, संकेत गायकवाड (देशमुख), तेजस अमृतकर यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.