नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला. गेली तीन दिवस महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निलीमा दिनकर महाजन (रा.देवघरे बिल्डीग,जीपीओ समोर त्र्यंबकरोड) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे. महाजन गेल्या ३० जुलै रोजी आपल्या राहत्या घरात मेनबत्ती पेटवित असताना ही घटना घडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास वीजप्रवाह खंडीत झाल्याने त्या मेणबत्ती पेटवित असतांना पेटती मेणबत्ती अंगावर पडल्याने कपड्यांनी पेट घेतला होता. या घटनेत त्या ६० टक्के भाजल्याने मुलगी सुजाता दस्तानी यांनी त्यांना तात्काळ मुंबईनाका परिसरातील नारायणी हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
गेली तीन दिवस अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी (दि.३) सायंकाळी उपचार सुरू असतांना डॉ. शितल जैन यानी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार विकास कदिलकर करीत आहेत.