नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम वर्ष २०२५- २०२६ अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण १५ मृद व परीक्षण केंद्रांची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.
विविध रासायनिक खते व औषधांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. याबरोबरच वातावरणातील बदलांचा परिणामही जमिनीवर होत असून त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत मृद परीक्षणाची गरज जाणवू लागली आहे. गेल्या काही वर्षांत शेतकरी मृद परीक्षण करून घेत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी उत्तीर्ण तरुण- तरुणींना मृद चाचणी प्रयोगशाळेसाठी संधी देण्यात येणार आहे.
प्रयोगशाळा उभारणीसाठी प्रत्येकी एक लाख ५० हजार रुपयांचे अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. प्रत्येक प्रयोगशाळेची वार्षिक मृद तपासणी क्षमता तीन हजार नमुने एवढी राहणार आहे. यातील पहिल्या ३०० नमुन्यांची तपासणी दर नमुन्यावर ३०० रुपये शासनाकडून दिले जातील. पुढील ५०० मृद नमुन्यांना २० रुपये प्रति नमुना दराप्रमाणे निधी देण्यात येईल. उर्वरित २२०० नमुन्यांची तपासणी संबंधित प्रयोगशाळेत स्वत:च्या खर्चावर शासन दरानुसार शेतकऱ्यांकडून शुल्क आकारून करू शकेल.
याकरीता गावपातळीवर प्रयोगशाळांसाठी इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांकडून प्रस्ताव, अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थी निवडीचे निकष असे : अर्ज करणाऱ्या तरुण- तरुणींनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यास विज्ञान आणि संगणकाचे ज्ञान असणे असावे. वय १८ ते २७ वर्षांदरम्यान असावे.
शेतकरी उत्पादक संस्था, कृषी क्लिनिक, कृषी व्यवसाय केंद्र, माजी सैनिक, बचत गट, किरकोळ खत विक्रेते, शाळा, महाविद्यालय, असे विविध घटक अर्ज करू शकतात. अर्जांची छाननी जिल्हा कार्यालय, समितीमार्फत केली जाईल. इच्छुक अर्जदाराने अर्जासमवेत शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. लाभार्थी संस्थेची स्वत:च्या मालकीची किमान चार वर्षे भाडेतत्वावर जागा असणे आवश्यक आहे. इच्छुक अर्जदार, संस्थांनी कृषी भवन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अग्निशमन केंद्राजवळ, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक, dsaonashik@gmail.com या ई-मेल आयडीवर ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत.