इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – सातपूर आणि अंबड औद्योगिक क्षेत्राच्या पाच किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या भूखंडांवरील प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरी मिळविण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चालत असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला अखेर यश आले आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेच्या सुनावणीत, उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की सातपूर – अंबड औद्योगिक क्षेत्राच्या पाच कि.मी. परिघात येणाऱ्या प्रकल्पांना सध्याच्या अद्ययावत CEPI (Comprehensive Environmental Pollution Index) स्कोअर – 55.43 – च्या आधारे पर्यावरणीय मंजुरीस पात्र ठरवता येईल.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले हा निकाल म्हणजे नाशिकच्या रिअल इस्टेट उद्योगासाठी मोठा श्वास आहे. आमचा उद्देश नाशिकमध्ये प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया सुलभ करणे आणि शाश्वत व संतुलित शहरी विकासाला चालना देणे हा आहे. आमच्या टीमने मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने कायदेशीर स्तरावर यासाठी प्रयत्न केले आणि आज आम्ही एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा निकाल केवळ आमच्यासाठी नाही, तर संपूर्ण नाशिकच्या बांधकाम व्यवसायासाठी एक वाट मोकळी करणारा निर्णय आहे.
“हा निर्णय म्हणजे केवळ एक कायदेशीर विजय नाही, तर एक दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव टाकणारी प्रक्रिया आहे. आम्ही सातत्याने नियमांचे पालन करत, पर्यावरणीय निकषांची अचूक माहिती, व शाश्वततेचा आदर्श ठेवत हे काम पुढे नेले. या निकालामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात बंद दरवाजे आता उघडले गेले आहेत. आम्ही आमच्या सर्व सदस्यांसाठी ही माहिती पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देत राहू.”
यामुळे होणारे परिणाम:
- 5 किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या अनेक प्रलंबित प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरीचा मार्ग मोकळा
- नवीन प्रकल्प व गुंतवणुकीला गती मिळणार
- बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया होणार सुलभ
- शाश्वत विकासाचे धोरण अधिक बळकट होणार
क्रेडाई नाशिक मेट्रोकडून सदस्यांना आवाहन:
या निर्णयाची अधिकृत कॉपी क्रेडाई नाशिक मेट्रोच्या कार्यालयात उपलब्ध आहे. या संदर्भात अधिक माहिती, सल्ला किंवा मदतीसाठी सर्व सदस्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.
एकसंघ प्रयत्नांचे यश
या विजयामागे फक्त कायदेशीर बाजू नाही, तर क्रेडाईच्या संपूर्ण टीमचे, सदस्यांचा, सल्लागार मंडळाचा आणि कार्यकारिणीचा सततचा सहभाग आणि पाठिंबा आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे हे यश नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला एक सकारात्मक दिशा देणारे आहे.