नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- योग विद्या भारतीय परंपरेचा एक भाग आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमातून योग जगासाठी अमूल्य भेट ठरला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील नागरिक सहभागी होत आहेत. यामुळे जगातील नागरिकांसाठी योग विद्या आरोग्यदायी आधार ठरली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ आणि कल्याण मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी येथे केले.
केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे आज सकाळी गौरी पटांगण, नाशिक येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा ५० वा योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे डॉ. काशिनाथ समगण्डी, योग विद्या गुरुकुलचे डॉ. विश्वास मंडलिक आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग संगम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
केंद्रीय मंत्री श्री. जाधव म्हणाले की, नाशिक शहर हे अध्यात्म आणि संस्कृतीचे केंद्र आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळा आस्था आणि परपंरेचा संगम आहे. त्याच प्रमाणे योग स्वास्थ्य, संस्कृती आणि एकतेचा संगम ठरेल. गोदावरी नदीच्या काठावर योग दिनाचा कार्यक्रम होत आहे ही समाधानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून २०२५ रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होत आहे. योग दिनाच्या माध्यमातून ‘वसुधेव कुटुंबकम’ ही संकल्पना साकारली जात आहे. योग दिन हा एक उत्सव आहे. यातून मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. योग दिनाचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय उत्सव झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्यासाठी योग’ अशी संकल्पना मांडली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्यासाठी भारत प्रतिबद्ध असल्याचे स्पष्ट होते, या उपक्रमातून जग एक परिवार असल्याची भावना अंगीकारावी. यातून योगाचे होणारे लाभ याविषयी माहिती द्यावी, असेही मंत्री श्री. जाधव यांनी सांगितले. आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव डॉ. मोनालिसा दास यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली.