नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ८२ वर्षीय रुग्णाला स्ट्रोक आलेला असताना नाशिकमधील ‘सह्याद्रि हॉस्पिटल’ ने त्वरीत उपचार करून या वयोवृद्धाला बरे केले. वैद्यकीय उपचारांमध्ये वेळेवर हस्तक्षेप फार महत्त्वाचा असतो, हे या रुग्णालयाने यातून पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. हॉस्पिटल’मधील निष्णात (इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट) डॉ. श्रीपाल शाह यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून, वेळेच्या चौकटीपलीकडे जाऊन उपचार केले; त्यामुळे स्ट्रोकमधून बरे होण्यासाठीचा आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.
या रुग्णाला ‘स्ट्रोक’मुळे हालचाल करता येत नव्हती व बोलताही येत नव्हते. पहिली काही लक्षणे दिसल्यावर लगेचच्या ४ तासांच्या कालावधीत उपचारांस सुरुवात करणे फार महत्त्वाचे असते. या कालावधीस ‘सुवर्ण काळ’ (गोल्डन अवर्स) असे मानले जाते. या काळात होणारे उपचार सर्वाधिक परिणामकारक असतात. संबंधित रुग्ण हा या १६ तासांच्या नंतर रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने प्रसंगावधान राखून त्याच्यावर एक क्रांतिकारी शस्त्रक्रिया केली. या वेळेत झालेल्या उपचारामुळे रुग्णामध्ये उल्लेखनीय सुधारणा दिसून आल्या. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांत रुग्ण पुन्हा बोलायला व चालायला लागला .त्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्णावर यशस्वीपणे करण्यात आलेल्या ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ या प्रक्रियेचे महत्त्व डॉ. शाह यांनी स्पष्ट केले. ही शस्त्रक्रिया स्ट्रोक आल्यानंतर पहिल्या ६ तासांत केली जाते, मात्र या विशिष्ट प्रकरणात ही शस्त्रक्रिया २४ तासांत करण्यात आली. हे ‘क्लिनिकल रेडिओलॉजिकल मिसमॅच’ या कारणामुळे शक्य झाले. याचा अर्थ असा की, रुग्णामध्ये दिसणारी गंभीर लक्षणे आणि ‘एमआरआय स्कॅन’मध्ये दिसणारे तुलनेने सौम्य नुकसान यामध्ये तफावत होती. यामुळे डॉक्टरांना विलंबानंतरही प्रभावी उपचार करता आले.
या प्रक्रियेमध्ये मेंदूतील अँजिओग्राफी या अत्याधुनिक प्रतिमा-तंत्राचा वापर करून प्रमुख रक्तवाहिनीत अडथळा शोधून काढून तो स्टेण्टच्या माध्यमातून दूर करण्यात आला. यामुळे मेंदूतील रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आणि रुग्णाच्या प्रकृतीत मोठा सुधार दिसून आला. डॉ. शाह म्हणाले, “या प्रकरणाने वैद्यकीय तंत्रज्ञान किती पुढे गेले आहे हे दाखवून दिले, तसेच सह्याद्रिच्या तज्ज्ञ वैद्यकीय चमूच्या कौशल्याची प्रचिती आली. स्ट्रोकवरील उपचारांसाठीचा कालावधी वाढवण्याच्या शक्यताही यामुळे अधिक स्पष्ट झाल्या आहेत.”
“स्ट्रोकची लक्षणे वेळेवर ओळखणे हे त्यातून बरे होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे” असे सांगून डॉ. श्रीपाल शाह म्हणाले, “अचानकपणे तोंड वाकडे होणे किंवा एक बाजूला जड पडणे, बोलता न येणे, तोल जाणे किंवा दिसायला कमी होणे ही ‘स्ट्रोक’ची प्रमुख लक्षणे असू शकतात. ती दिसताच त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
सह्याद्रि हॉस्पिटल नाशिक ‘स्ट्रोक’वरील तातडीच्या उपचारांसाठी प्रसिद्ध असून ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर मध्ये अनुभवी डॉक्टर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान व समर्पित ‘कॅथ लॅब’ सुविधेमुळे अशी आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी हे रुग्णालय पूर्णपणे सक्षम आहे.