नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रविवारी दुपारी पेठ रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेच्या आवारात आग लागल्याने तब्बल नऊ रिक्षा व दोन चारचाकी असे अकरा वाहने जळून खाक झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक दलाच्या दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.
नाशिक आरटीओने विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या नऊ रिक्षा, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक स्विफ्ट डिझायर अशी अकरा वाहने या आगीत जळाली.
पेठरोड परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची विभागीय कार्यशाळा असून कार्यशाळेच्या मोकळ्या जागेत आरटीओ कारवाई करण्यात आलेली वाहने लावली जातात.
दुपारी कार्यशाळेच्या आवारात गवतात उभ्या असलेल्या वाहनांच्या ठिकाणी धूर निघू लागला आणि काही वेळात या ठिकाणावरील झाडाचा पाचोळा पेटल्याने वाहने आगीच्या भक्ष्य स्थानी सापडली. ही आग कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती कळविली. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात आली.