नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील काठे गल्ली परिसरातील अनाधिकृत दर्ग्याच्या तोडण्याचे काम पहाटेपासून सुरु झाले. पण, त्याआधी रात्रीच्यावेळी येथे हिंसाचार झाल्याची घटना घडली. त्यात ३१ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करुन दगडफेक केली. या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक करणा-या १५ लोकांना ताब्यात घेतले असून ५७ संशयास्पद मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहे.
रात्रीच्या वेळी ५०० पोलिसांचा बंदोबस्त होता. पण, जमाव ४०० च्या वर होता. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. पोलिसांनी या घटनेनंतर काही जणांना ताब्यातही घेतले. त्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढ करण्यात आली असून कटेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हा अनधिकृत दर्गा हटवण्याची गेल्या अनेक वर्षीची मागणी होती. गेल्या महिन्यात हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने आंदोलन ही करण्यात आले होते. वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी झाली. उच्च न्यायालयात दर्गा ट्रस्टला दर्गा बाबतीत काही पुरावे सादर करत आला नाही. त्यानंतर
महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिलला नोटीस बजावली होती. स्वत.हून बांधकाम काढून घ्या, अन्यथा अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला होता. पण, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सध्या परिसरात शांतता असून या मार्गावरील वाहतूक पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आली असून बंदोबस्त कायम राहणार आहे.