नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालयामार्फत ‘देखो अपना देश” या योजनेअंतर्गत टूर सर्किटचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १४ व १५ एप्रिल रोजी या सहलीचे विनाशुल्क आयोजन करण्यात आले होते. ह्या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी १०५ पर्यटकांनी ह्या उपक्रमाचा लाभ घेतला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित टूर सर्किट हा एक अभिनव उपक्रम ठरला आहे. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे सामाजिक योगदान आणि भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे कर्तृत्व यांचा गौरव करणे हा या सर्किटचा उद्देश आहे. या सर्किटद्वारे पर्यटकांना बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा अनुभव घेता येईल, ज्यामुळे त्यांचा इतिहास आणि तत्त्वज्ञान समजण्यास मदत होईल.
पर्यटकांनी इ.स. पूर्व २०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी – त्रिरश्मी लेणी ला भेट देऊन त्याची माहिती घेतली, लेणीच्या पायथ्याशी बांधलेल्या बौद्ध स्मारक स्तूपाला भेट देऊन, स्तूपाभोवती श्रीलंकेतील अनुराधापूर येथून आणलेल्या महाबोधी वृक्षाची शाखा – बोधिवृक्ष चे दर्शन तसेच स्तूपामध्ये पर्यटकांनी ध्यान आणि प्रार्थना केली, त्यांनंतर महामानव आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यातील महत्वाचे काळाराम मंदिर सत्याग्रह चे स्मरणासाठी काळाराम मंदिर येथे पर्यटकांनी भेट दिली त्यांनंतर येवला येतील मुक्तिभूमी स्मारकास भेट देण्यात आली, सहली दरम्यान पर्यटकांना महामानव आंबेडकरांवरील पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. अशी माहिती श्रीमती मधुमती सरदेसाई,उपसंचालक – पर्यटन संचालनालय, नाशिक विभाग ह्यांनी दिली
ह्याप्रसंगी पर्यटकांनी आपला अनुभव कथन करतांना सांगितले शासनाद्वारे सुरु करण्यात आलेला हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे, १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ह्या सहली मध्ये सहभागी होण्याची संधी बाळ गोपाळांसह अबाल वृद्धांसाठी हि सहल पर्वणी ठरली आहे पर्यटनासह अभ्यास दौरा देखील झाला आहे.