नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोरबंदर जवळच्या अरबी समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या कोळी लोकांची नाव समुद्रात वादळ आल्याने उलटली. त्यामुळे त्यातील ७ जण तेथे अडकले. ही बातमी दमणच्या तटरक्षक दलाच्या एयर स्टेशनला समजताच त्यांची सुटका करण्यासाठी
तेथील कमांडंट कुणाल चंद्रकांत नाईक यांनी ताबडतोब हेलिकॉप्टर तयार करुन आपल्या सहकाऱ्यांसह प्रयाण केले. अंधारायची रात्रीची वेळ, खवळलेला समुद्र, सोसाट्याचा वारा अशा प्रतिकुल परीस्थितीत हेलिकॉप्टर स्थिर व सुरक्षित ठेवणे हे अत्यंत जिकिरीचे काम असते. पण अशा कठीण परिस्थितीतही त्या सर्व ७ जणांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणून पोहोचविले.
कमांडंट कुणाल चंद्रकांत नाईक यांनी अतुलनीय साहस, कर्तव्यनिष्ठा, तांत्रिकदृष्ट्या उच्च कुशलता, सामायिक भान, आपल्या जीवाची पर्वा न करता सेनेच्या गौरवशाली परंपरेचा मान राखत तटरक्षक दलाचे “वयम् रक्षाम:” या ब्रिदवाक्याची शान राखली. यासाठी त्यांना तटरक्षक दलाचा शौर्य पुरस्कार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे अलंकरण समारंभात प्रदान करण्यात आला. कुणाल चंद्रकांत नाईक हे आपल्या नाशिकचे चंद्रकांत नाईक (भूतपूर्व वायु सैनिक) यांचे सुपुत्र आहेत.