नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिकच्या औद्योगिक विकासाला वेग देण्यास कटिबद्ध असून उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करू.औद्योगिक संघटना तसेच उद्योजकांशी संवाद प्रक्रिया सातत्याने सुरूच राहील. जिल्ह्यातील औद्योगिक शांतता टिकवण्यासाठी आपण सारे हातात हात मिळून काम करूया, असे उद्गार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नाशिकचे नूतन प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी केले.
दीर्घकाळापासून हे पद रिक्त होते. ते तातडीने भरावे यासाठी निमाचे नूतन अध्यक्ष आशिष नहार आणि त्यांच्या टीमने उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन मंत्रालयात त्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर तातडीने सूत्रे फिरली व एमआयडीसीच्या नाशिक प्रादेशिक अधिकारीपदाची माळ दीपक पाटील यांच्या गळ्यात पडली.मंगळवारी त्यांनी लगेचच या पदाची सूत्रेही स्वीकारली.यानंतर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा),अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा),नाईस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, लघुउद्योग भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी दीपक पाटील यांची उद्योग भवनात भेट घेत त्यांचा सत्कार केला त्यावेळी पाटील बोलत होते.
उद्योजकांशी निगडित आणि प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून त्याचा तातडीने निपटारा केला जाईल. सर्व औद्योगिक संघटनांच्या कार्यालयांना भेटी देऊन त्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्याचा आपला मानस राहील. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सर्व समस्यांवर मार्ग काढला जाईल, असेही दीपक पाटील पुढे म्हणाले. निमाचे अध्यक्ष आशिष नहार,आयमाचे अध्यक्ष ललित बूब,नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य,लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तपाडिया यांनी यावेळी आपापल्या संघटनांचे प्रश्न नूतन प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या कानावर घातले. जिल्ह्यातील औद्योगिक शांतता टिकविण्यासाठी आमचे आपणास सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाहीसुद्धा या सर्वांनी चर्चेच्यावेळी दिली.
यावेळी निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी,सचिव राजेंद्र अहिरे,आयमा ॲडव्हायजरी कमिटीचे चेयरमन ज्ञानेश्वर गोपाळे, आयमा माजी अध्यक्ष वरून तलवार, निमा सहसचिव किरण पाटील, खजिनदार राजेंद्र वडनेरे, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सचिव प्रमोद वाघ, महाराष्ट्र चेंबरचे राजेंद्र कोठावदे, निमाचे सचिन कंकरेज, वैभव नागशेठिया आदी उद्योजक उपस्थित होते.