नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हक्काचे घर हे गरिबाला बंगल्यासारखेच आहे. महा आवास अभियान अंतर्गत गरीब माणसाचे स्वप्न आपण पूर्ण करत आहोत. ग्रामविकास मंत्री असताना देशात पहिला क्रमांक आला होता आज या अभियानात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून नाशिक विभागाने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्ती मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अभिनंदन केले.
आज नाशिक जिह्यातील १ लाख ४५ हजार ७२७ घरकुल लाभार्थ्याना मंजूरी पत्र देण्यात आले तर ८० हजार घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर घरकुलाच्या पहिला हप्त्याचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात जलसंपदा तथा आपत्ति व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.
ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी राज्यात महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासनाकडून दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी लाभार्थ्यांना मंजूरी पत्र देणे व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे येथे आयोजित या कार्यक्रमासाठी मा. गृहमंत्री अमित शहा, भारत सरकार, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास नाशिक येथून दुरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे जलसंपदा तथा आपत्ति व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व मा.शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे मालेगाव येथून तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले .
कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे,विभागीत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, आयुक्त कार्यालयातील डॉ. सारिका बारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्ह्यातील विविध लाभार्थी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
दरम्यान,राज्याच्या एकूण घरकुल उद्दिष्टपैकी २७. ६३ म्हणजेच ५ लक्ष ४३ हजार ४२४ घरांचे उद्दिष्ट नाशिक विभागाला असून नाशिक विभागाने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्ती मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. संख्यात्मक दृष्टया नाशिक विभागातील ५ पैकी ४ जिल्हे राज्यात प्रथम पाच मध्ये आहेत.