नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): सन 2025-26 मध्ये घेण्यात येणाऱ्या आठव्या आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम गुणवत्तापूर्वक व विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी व्यापक जनजागृती व प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आठवी आर्थिक गणना 2025-26 जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.शर्मा बोलत होते. बैठकीस जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक हेमंत अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, यांच्यासह समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.शर्मा म्हणाले की, गणनेच्या क्षेत्रकामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करावा. त्यानुसार आर्थिक गणनेच्या कामासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या निश्चित कराव्यात. गणनेचे सर्व भागधारक जिल्हा, तालुका, नागरी/ ग्रामीण पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांचे संबंधित अधिकारी, प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यापर्यंत आवश्यक माहिती व मार्गदर्शक तत्वांचा प्रसार सुनिश्चित करावा. याबाबत तालुकास्तरीय समितीस आवश्यक निर्देश देण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत दिल्या.
उपसंचालक श्री. अहिरे यांनी आर्थिक गणनेबाबत उद्दिष्ट, आर्थिक गणनेची पार्श्वभूमी, व्याप्ती कक्षा, गणनेत वगळण्यात आलेले घटक, विविध स्तरावरील समित्या, गणनेबाबतचे नियोजन व पूर्वतयारी, विविध स्तरावरील प्रशिक्षणे व क्षमता बांधणी, मनुष्यबळ आराखडा याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती विषद केली.