इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकमध्ये सुरु असलेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्र – बडोदा सामन्यात काल ७ बाद २५८ या धावसंख्येवरुन पुढे खेळतांना आज महाराष्ट्र संघाने ३९ धावांची भर घातली आणि संपुर्ण संघ २९७ धावसंख्येवर बाद झाला. मात्र त्यानंतर फलंदाजीला आलेल्या बडोद्याचे ४ खंदे फलंदाज अवघ्या २८ धावात परतलेले असल्याने उपहारासाठी खेळ थांबला. त्यावेळी बडोदा संघ अडचणीत सापडल्याचे चिञ नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर दिसून येत आहे.
आज सकाळी सौरभ नवलेने चांगली फटकेबाजी केली. १२ चौकारांच्या मदतीने त्याने ८३ धावा केल्या. शतकाकडे त्याची वाटचाल सुरु झालेली असतांनाच अतित शेठच्या गोलंदाजीवर तो शिवलिक शर्मा कडे सोपा झेल देवून बाद झाला. सामन्यात एकवेळ महाराष्ट्र संघाची अवस्था ६ बाद १४५ अशी झालेली असतांना सौरभ नवले या यष्टीरक्षक फलंदाजाने मात्र संयमाने फलंदाजी करुन महाराष्ट्र संघाचा डाव सावरला.
आता ५४.६१ हा सौरभच्या फलंदाजीचा स्ट्राईक रेट सामन्यात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ३०० धावसंख्या, ही मॅजिक फिगर महाराष्ट्राला गाठता आलेली नसली तरी बडोदा संघाला अडचणीत आणू शकेल असे २९७ धावांचे माफक आव्हान या संघाने निश्चित पणे उभे केले आहे. बडोद्याच्या अतित शेठने ६ बळी घेतले.