प्राधिकरणाकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पत्र
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक शहरातील उड्डाणपुलावर पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस अडथळ निर्माण होऊ नये यासाठी उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंनी क्रॅश बॅरियर्समध्ये छिद्रे पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याठिकाणी अतिरिक्त पाईप लाईन टाकून उड्डाणपुलावर साचणारे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येणार आहे.या निर्णयाबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पत्र प्राप्त झाले आहे.
नाशिक शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे उड्डाणपुलावर पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.या उड्डाणपुलावर पाण्याचा निचरा होण्यासाठी लावण्यात आलेल्या पीव्हीसी पाईप मधून पाणी पूर्ण क्षमतेने बाहेर पडत नसल्याने उड्डाणपुलावर पावसाळ्यात अनेक वेळा पाणी साचते. तसेच उड्डाणपुलावरून पाण्याची गळती होऊन पुलाच्या खालून जाणारी वाहतूक देखील विस्कळीत होते. अशी परिस्थिती वारंवार उद्भवू नये यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मा. ना. श्री. नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार यांना दि. ०२.०१.२०२५ रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास यावर उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यास विनंती केली होती.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्राधिकरणाला सूचना केल्यानंतर प्राधिकरणाकडून याबाबत अभ्यास करत उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंनी क्रॅश बॅरियर्समध्ये छिद्रे पाडण्यात येऊन साचनारे पाणी अतिरिक्त पाईपद्वारे गोदावरी पात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दि. १३.०१.२०२५ रोजी पत्र पाठवण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंनी क्रॅश बॅरियर्समध्ये छिद्रे पाडण्याचा निर्णय घेतल्याने उड्डाणपुलावर साठणारे पाणी हे अतिरिक्त पाईपद्वारे गोदावरी पात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे पावसाळयात उड्डाणपुलाच्या वरून आणि खालच्या बाजूने निर्माण होणारा वाहतुकीचा अडथळा दूर होणार आहे. तसेच उड्डाणपुलावरून होणारी पाण्याची गळती देखील थांबणार आहे.