नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३१ डिसेंबर थर्टी फर्स्टचे औचित्य साधून आश्रमशाळेतील काही कर्मचारी बारचा आधार घेतील असा अंदाज आहे. त्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून सदर पथकामार्फत बार, हॉटेल या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी केली जाईल आणि तपासणीत जे मुख्याध्यापक, गृहपाल, शिक्षक शिक्षकेतर बारमध्ये दिसतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवणचे अकुनुरी नरेश यांनी काढले आहे.
या आदेशात म्हटले आहे की, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्यासाठी शाळेतील कर्मचारी हे महत्त्वाचे घटक मानले जातात, तरीही काही कर्मचारी बारमध्ये जाऊन मद्यपान करतात. यामुळे प्रवासात अपघात होऊन काही कर्मचारी कायमचे जायबंदी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून नाशिक महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत शालेय कर्मचाऱ्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी त्यांचे उद्बोधन करण्यात येत आहे, शाळेच्या आवारात तंबाखू, गुटखा बाळगण्यासही बंदी घातली आहे, जो कर्मचारी तंबाखू खाताना आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे तसेच बार मध्ये कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या अपघातात घट झाली असून, कर्मचारी निर्व्यसनी होण्यास मदत झाली आहे. शालेय व वसतिगृह परिसरात कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची मुख्याध्यापक व गृहपाल यांनी दक्षता घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे.
