इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नील चंद्रात्रेची बीसीसीआयच्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून गोवा विरुद्ध पहिल्याच डावात नीलने आपल्या भेदक डावखु-या फिरकी गोलंदाजीने ७ बळी टिपले.
सुरत येथे ६ ते ३० डिसेंबर दरम्यान होत असलेल्या विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे साखळी सामन्यात नीलने ८ षटके २ निर्धाव २१ धावा व ७ बळी अशी जोरदार कामगिरी केली. त्यामुळे पहिल्या डावात गोवा संघ ४७.२ षटकांत सर्वबाद ७७ इतक्याच धावा करू शकला. व्यंकटेश बेहरे व ज्ञानदीप गवळी हे दोघे नाशिककर देखील आधीपासूनच महाराष्ट्र संघात आहेत.
नीलने विविध वयोगटात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या – इन्व्हिटेशन लीग व सुपर लीग – क्रिकेट स्पर्धेत वेळोवेळी नाशिक जिल्हा संघातर्फे पुढील प्रमाणे प्रभावी अष्टपैलू कामगिरी केली आहे :
१- २०२२-२३ – १४ वर्षांखालील गटात २९८ धावा व २३ बळी
२- २०२३ – १६ वर्षांखालील गटात २०१ धावा व ४० बळी
३- २०२४ – १४ वर्षांखालील गटात ३०३ धावा व २१ बळी
४- २०२४-२५ – १६ वर्षांखालील गटात १०३ धावा व २९ बळी
याप्रमाणे १४ व १६ वर्षांखालील गटात गेल्या दोन वर्षात ९०५ धावा व ११३ बळी तर फक्त १६ वर्षांखालील गटात एकूण ७० बळी अशी प्रभावी कामगिरी केली आहे. नील चंद्रात्रे याचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.