सुदर्शन सारडा, नाशिक
सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीसांकडून अंगीकारलेले ब्रीद अतिशय समर्पक व सार्थक आहे. हे उच्च आध्यात्मिक ब्रीद”खलरक्षणाय सदनिग्रहणाय”सध्या नाशिक जिल्ह्यात उलट होऊ पाहतेय का? असा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे.
सध्या अत्र तत्र अन् सर्वत्र जे अवैध धंदे ठाण मांडून सुरू झाले आहे. त्याला नेमकं कुणाचं वरदहस्त आहे. याचाच शोध घेण्याचे आव्हान आता पोलीसप्रमुखांसमोर आहे. तरुणाईला देशोधडीला लावणारे अनेक प्रकारचे अवैध धंदे हे माईंड गेम पेक्षा लाईफ गेम चेंजर होऊ पाहत आहे. गेल्या काही वर्षांपासून ओस पडलेल्या ठिकठिकाणच्या जागांवर आता मालक आणि गरदुल्ल्यांची रेलचेल सुरू झाली आहे. कुठे आकडेमोड सुरू असल्याचे दिसते तर कुठे दिसलेल्या आकड्यातून आयुष्यातला करंट गायब होताना दिसतो. कुठे मुखातून उडणाऱ्या पिचकाऱ्या त्याची साक्ष देतात असे अनेक प्रसंग सध्या सुरूच आहे. हे सगळं होत असताना भगवतगीतेतून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य श्रीमद्भागवत पुराणातील दहाव्या स्कंधात २७ व्या श्लोकातील चार ओळींपैकी दुसऱ्या ओळीत आहे.
अगदी पुरातन काळात लिहिल्या गेलेल्या या ओळीचा थोडक्यात अर्थ म्हणजे साधूंच्या रक्षणासाठी व दृष्टांच्या नाशासाठी असा होतो. द्वापार,त्रेतायुगात लिहिलेल्या या ओळींच्या अर्थाचा सध्याच्या कलियुगात शोध लावायचा म्हटल्यास कोण साधू अन् कोण दृष्ट येथून सुरवात करावी लागेल. अर्थात त्या वाक्याचा व्यापक विस्तार भल्याभल्यांना परवडणारा देखील नाही. त्यामुळे त्याचे उच्चार केले तरी पुरे असाच कयास सध्याच्या युगात बरा वाटतो!
या ब्रिदाची समर्पकता ही तशीच आहे.पोलीस अधिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विक्रम देशमाने हे कमालीचे सतर्क अधिकारी म्हणून चर्चिले गेले खरे पण त्याला किनार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची होती. परंतु आचारसंहिता उठावी अन् जणू आनंदाचे डोहाळे लागावे असा होरा नाशिक जिल्ह्याच्या चारही वेशींच्या कमानींमधून दिसून आला हे ही राजरोस सत्य नाकारता येणारे नाही. एकूणच असा कोणता आदेश दिला गेला की सर्वत्र हाहाकार होऊन अवैधपणाचा साक्षात्कार झाला याचा शोध घेण्याचे कसब तमाम साहेब लोकांनी दाखवावे इतकीच काय ती जनसामान्य पामरांची इच्छा आहे.
हे प्रभु! एखादा राजा आपल्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हाला दु:ख देतो,की आमचीच कर्मे आम्हांला दु:ख देत आहेत,हेच आम्हांला कळत नाही.(अध्याय २७ समाप्त)