नाशिक – नाशिकचे भूमिपुत्र डॉ. प्रकाश बच्छाव यांची नुकतीच सहसंचालक ,उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या अत्यंत महत्वाच्या प्रशाकीय पदावर महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. एक प्राथमिक शिक्षक ते उच्च शिक्षण संचालनालयातील सहसंचालक पदास गवसणी घालणे ही आसामान्य अशी बाब आहे. डॉ. बच्छाव नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील साधारण कष्टकरी-शेतकरी कुटुंबातील असून बालपणापासूनच कष्टाळू, ध्येयासक्त, कमालीचे बुद्धिमान होते. त्यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात झालेले असून नाशिक येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेत ते काही काळ प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळा पातळीवर त्यांची कारकीर्द उल्लेखनीय अशी होतीच मात्र आजही आपल्या बुद्धीवैभवास कष्टाची जोड देत ते यशाचा पुढील टप्पा गाठत आहेत. एका छोट्याशा खेड्यातून आलेले, कुठलीही शैक्षणिक, उच्चपदांची पार्श्वभूमी नसलेल्या साधारण कुटुंबातील डॉ. प्रकाश बच्छाव आज मेहनत व जिद्दीच्या जोरावर सहसंचालक म्हणून रुजू होतात ही नक्कीच प्रेरक अशी गोष्ट आहे.
महाराष्ट्र लोककसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देऊन २००३ साली ते सुरूवातीस जे.जे स्कूल ऑफ आर्ट्स या आशियाखंडातील सर्वात मोठ्या लौकिकपात्र अशा कलासंस्थेत रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती झाली. पुढे कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, परीक्षा नियंत्रक या पदावर डॉ. प्रकाश बच्छाव रुजू झाले. येथे त्यांनी अत्यंत उल्लेखनीय असे काम केले. तेथील सेवेत त्यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ज्या कला परीक्षा होत त्यातील परीक्षा पद्धती, मूल्यमापन केंद्र निकाल कार्यपद्धती यात आमुलाग्र असा बदल केला. त्यानुसारच आज कला संचालनालयाचे काम सुरू आहे. त्यानंतर सरांनी प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र उच्च शिक्षण सेवा गट अ ही परीक्षा दिली व चार वर्षे ,उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे प्रशासनाधिकारी म्हणून नियुक्त झाले. मधल्या काळात प्रशासकीय कामांच्या एवढ्या व्यस्ततेत सरांनी शिक्षणशास्त्र विषया त डॉक्टरेटदेखील प्राप्त केली आहे. अभावातून प्रभाव निर्माण करणार्या अशा ह्या व्यक्तिमत्वाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
…