नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलीकडे सर्व समाजात लग्नसमारंभात पैशांची वारेमाप उधळपट्टी करण्यात येते. श्रीमंतीचे प्रदर्शन करून प्रचंड खर्चाची स्पर्धा होते. त्यावर मात करीत संपन्न जैन परिवारातील नयन पटणी व अवनी गंगवाल या जोडप्याने म्हसरूळ गजपंथ जैन तीर्थक्षेत्र येथे साध्या चक्रवर्ती पध्दतीने विवाह करुन समाजात आदर्श निर्माण केला.
येथील पंकज व कल्पना पाटणी दांपत्याचे सुपुत्र नयन आणि पुणे येथील अभियंता संदेश आणि डॉ. श्वेतल गंगवाल यांची कन्या अवनी यांचा विवाह निश्चित झाला होता. दि.१६ फेब्रुवारी रोजी हॉटेल ताज येथे दोन दिवसांचा भपकेबाज सोहळा होणार होता. दि.६ रोजी प.पू. युगल मुनिश्री अमोघकिर्ती आणि अमरकिर्ती महाराजांचे दर्शन घेतले असता त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत साधेपणाने विवाह करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांना उपस्थित सर्वांनी प्रतिसाद दिला.
नयन व अवनी यांनी तसेच दोन्ही परिवारांनी चर्चा करून साधेपणाने विवाह करण्याचे ठरवले. सेवानिवृत्त जीएसटी आयुक्त सुमेरकुमार काले, सुवर्णा काले, डॉ.अतुल जैन यांनी सर्वांचे अभिनंदन करुन त्यांना पाठिंबा दिला. नुकताच मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. समाजातील मान्यवरांनी या आदर्श कृतीचे अनुकरण युवकांनी करावे असे आवाहन केले आहे.