नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सण कोणताही असो तो इतरांसोबत सहभागी होऊन साजरा केल्यास त्याचा आनंद द्विगुणित होतो. नाशिक आधाराश्रमात निराधार बालकांची विशेष काळजी घेवून संगोपनसह संस्कार घडविले जातात. सणांच्या माध्यमातून बालकांसाठी विविध कार्यक्रमांसह उपक्रम राबविले जातात. त्यामुळे नाशिक आधाराश्रमातील पदाधिकारी, वृंद यांचे निराधार बालकांसाठीचे सेवाभावी कार्य स्तुत्य असे, अशा शब्दात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कौतुकाची थाप दिली.
आज घारपुरे घाट येथील नाशिक आधाराश्रमात “दिवाळीचा एक दिवस आमच्या सोबत” या आयोजित कार्यक्रमात ते जिल्हाधिकारी श्री.शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, बाल हक्क आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. मधुरा धारणे, आधाराश्रमाचे विश्वस्त ॲङ जयंत जायभावे, सेक्रेटरी हेमंत पाठक, कल्याणी दातार, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बाबर, बाल कल्याण समितीचे सदस्य गोपाळ शिंपी, शोभा पवार यांच्यासह आधाराश्रमाचे सदस्य व बालक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, आधाराश्रमातील ठेवली जाणारी स्वच्छता, शांततामय वातावरण, बालकांचे चांगल्या प्रकारे होणारे पोषण, आरोग्याची काळजी व शिक्षण या गोष्टींमुळे मुले भविष्यात चांगल्या प्रकारे विकसित होवून नक्कीच यश आत्मसात करतील. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातूनही या आधाराश्रमतील बालकांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात. दिवाळीसोबतच वर्षभरात होणाऱ्या प्रत्येक सणांच्या दिवशी बालकासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्यास नक्कीच बालकांना गुणांना उभारी मिळेल. निराधार मुलांमध्ये असलेल्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी व अशा बालकांना विदेशी भाषेचे शिक्षण मिळाले तर त्यांना नक्कीच भविष्यात विदेशात अनेक संधी उपलब्ध होतील. यादृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाकारी श्री. शर्मा यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या निर्देशानुसार एक दिवस आमच्यासोबत हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज नाशिक आधाराश्रमात “दिवाळीचा एक दिवस आमच्या सोबत” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हात एकूण 15 बालगृहे असून या सर्व बालगृहात प्रशासाकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या समवेत हा कार्यक्रम राबविला जाणार असून या माध्यमातून साधाल्या जाणाऱ्या वैचारीक संवादातून बालकांमध्ये आनंदाची भावना, चैतन्य व प्रेरणा निर्माण होणार असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी श्री. दुसाणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी बाल हक्क आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर व सेक्रेटरी हेमंत पाठक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला भावगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बालकांसमवेत मुक्त संवादही साधला.