नाशिक– नाशिक लेडीज सर्कल ११९ व प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या विद्यमाने देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पाच्या उदघाटनानंतर सामाजिक संस्थेतर्फे रमेश अय्यर यांनी पहिल्याच दिवशी ५००० सॅनिटरी पॅड्सची पहिली ऑर्डर व दरमहा ५०० पॅडची ऑर्डर देण्याची घोषणा केली.
नाशिक लेडीज सर्कल ११९ व प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी क्रिमसन प्रकल्प देहविक्रय करणाऱ्या महिलांना स्वावलंबी व सन्माननीय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून लेडीज सर्कलच्या केंद्र व राज्य प्रतिनिधी श्रीमती फरहीन राणा, श्रीमती निश्रीन काचवाला, उपाध्यक्ष प्रत्यशा चौहान, नाशिक लेडीज सर्कल ११९ च्या सचिव स्नेहा जोहोरी, समन्वयक मेघा राठी , अध्यक्ष डॉ. शीतल सेठी व प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या समन्वयक आसावरी देशपांडे उपस्थित होत्या.
शारीरिक आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी वेश्या वस्तीतील महिलांसाठी हा आंतरराष्ट्रीय सेवा प्रकल्प राबविण्यात येत असून त्या अंतर्गत सॅनिटरी पॅड्सचे उत्पादन करण्यात येणार आहे. सॅनिटरी पॅड सयंत्र व कच्चा माल असे अडीच लाखाचे साहित्य नाशिक लेडीज सर्कल ११९ तर्फे देण्यात आले. विशेष गोष्ट म्हणजे या सॅनिटरी नॅपकिन ऊत्पादनात प्लास्टिकचा वापर नसून ते जैविक विघटनशील (बायोडिग्रेडेबल) व पर्यावरण पूरक असणार आहे. ह्या प्रकल्पात महिलांना प्रथम प्रशिक्षित करन्यात आले आहे. हे पॅड ‘कारा’ या नावाने उपलब्ध होणार आहेत. रोजगाराची शाश्वत साधने उपलब्ध करुन देणे हा ह्या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन नाशिक लेडीज सर्कलच्या अध्यक्ष डॉ. शीतल सेठी यांनी याप्रसंगी केले. गिव्ह सामाजिक संस्थेतर्फे रमेश अय्यर यांनी पहिल्याच दिवशी ५००० सॅनिटरी पॅड्सची पहिली ऑर्डर व दरमहा ५०० पॅडची ऑर्डर देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष काळे, कुलदीप पवार, संदीप चांद्रमोरे, सोईफ सैयद,सचिन काळे , सुरेखा खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.