नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने आज प्रभाग २४ मधील विविध समस्यांबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांची भेट घेवून निवेदन सादर केले. पाणी टंचाई दूर करण्यासाठी दोन तास जादा पाणी पुरवठा करू; रस्ते खडी, डांबराने दुरूस्त करू, असे आश्वासन यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी दिले.
गोविंदनगर, कर्मयोगीनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, तिडकेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर, खांडे मळा आदी भागातील विविध समस्यांबाबत शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी प्रभाग २४ मधील नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना निवेदन दिले. यावेळी शहर अभियंता संजय अग्रवाल हजर होते. वरील भागात कमी प्रमाणात, अनियमित पाणीपुरवठा होतो. याबाबत अनेकदा निवेदने दिली, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक घराला किती लिटर पाणी पुरवठा होतो याची मोजणी करून कारवाई करू, अशा धमक्या पाणी पुरवठा अधिकारी देतात. हे खपवून घेतले जाणार नाही. अनेक ठिकाणचे रस्ते पूर्णपणे खराब झालेले असून, सर्व ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. प्रभागातील समस्या दूर करून सण, उत्सवाच्या काळात नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दोन दिवसात पाणी टंचाईवर तोडगा काढू. दररोज दोन तास जादा पाणी पुरवठा करू. रस्त्यावरील खड्डे, तसेच संपूर्ण खराब रस्ते हे खडी, डांबराने बुजविण्याचे काम दसर्यानंतर सुरू करण्यात येईल. सर्व संबंधित अधिकार्यांची बैठक बोलवून सूचना देण्यात येतील, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिले. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, राजेश पाटील, पंकज पवार, सुनील पाटील, धर्मा वाळके, छबु बच्छाव, बाजीराव लोखंडे, योगेश सिंगतकर, अमोल सोनवणे, जितेंद्र गांगुर्डे, अशोक चौधरी, श्रीकृष्ण पाटील, विनोद पोळ, बाळासाहेब राऊतराय, टी. टी. सोनवणे, आनंदा तिडके, प्रथमेश पाटील यांच्यासह नागरिक हजर होते.
अन्यथा घरपट्टी, पाणीपट्टीवर बहिष्कार
प्रभागातील समस्या सुटल्या नाहीत, तर घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध कर भरण्यावर बहिष्कार टाकू, यासाठी रहिवाशांमध्ये जागृती करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.