नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख पूजनीय संत राधानाथ स्वामी महाराज व संस्थेचे दोन वरिष्ठ संत पूज्य गौरांग प्रभू व पूज्य शिक्षाष्टकम् महाराज यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१०) रामतीर्थावर गंगा गोदावरी आरती केली जाणार आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने तीर्थ रामकुंड येथे दुतोंड्या मारुती जवळ श्रीगंगा गोदावरी महाआरती होत असते. या महाआरतीसाठी नाशिक महानगर, जिल्हा व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर, साधू व महंत, भाविक आरतीसाठी उपस्थित असतात.
या महाआरतीस देश-विदेशातील शासकीय सेवेतील व समाजातील अनेक गणमान्य अधिकारी व्यक्ती, उद्योगपती, यांनी भेट देऊन स्वहस्ते गोदावरीची आरती केली अाहे. सर्व समाजाला सोबत घेऊन हिंदू बांधवांच्या एकतेचे विराट दर्शन गोदाघाटावर होत असते. बुधवारी संत राधानाथ स्वामी महाराज व त्यांचे शिष्य यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.
नाशिककरांनी नवरात्रीच्या पावनपर्वामध्ये होत असलेल्या या संत दर्शन सोहळ्यासह गोदावरी महाआरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.