नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात एकाच वेळी १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सुरवात ही लाखो नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणाची हमी आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
आज महाराष्ट्रात नाशिकसह अंबरनाथ, भंडारा, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, वाशीम, बुलढाणा, जालना व मुंबई अशा १० वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते दूरदश्य संवाद प्रणालीद्वारे संपन्न झाले. नाशिक शहरातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृहात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला.
या समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मान्यवर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, राज्याचे अन्न, नागर पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ.शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, कुलसचिव राहुल बंगाळ, प्रति कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्यंकट गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी यांच्यासह अधिकारी व विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, आज १० ठिकाणी सुरू झालेली सर्व महाविद्यालये लाखो नागरिकांच्या सेवेची केंद्रे बनणार आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात वैद्यकीय ६ हजार विद्यार्थी क्षमता वाढणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थांना वैद्यकीय क्षेत्रात नव्या संधी निर्माण होणार असून त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मातृभाषेतही वैद्यकीय शिक्षण उपलब्ध होणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून संपूर्ण महाराष्ट्रात याचा आनंदोत्सव साजरा होतांना दिसत असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले , आज नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळ भूमिपूजन , शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारत व महाराष्ट्रात 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र हा वैद्यकीय क्षेत्रात प्रथम क्रमांचे राज्य होणार यात शंका नाही. नागपूर व शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे दळणवळण, व्यापार व उद्योगास चालना मिळणार आहे. देशभरातून साईभक्त शिर्डी येथे येत असतात. या ठिकाणी ६५० कोटी निधीतून एकीकृत टर्मिनल उभारण्यात येणार आहे. यातून शिर्डी येथील पर्यटन वाढून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. ५५ कोटी निधीतून शिर्डी विमातळावर कार्गो कॉम्पेक्स उभारले जात आहे. याचा फायदा शिर्डीसह, नाशिक मधील शेतकऱ्यांना होणार असून द्राक्ष, कांदा व भाजीपाला निर्यात व वाहतूकीस चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले
पालकमंत्री श्री भुसे यावेळी म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिकमध्ये होणे ही नाशिककर व जिल्हावासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची, गौरवाची व आनंदाची बाब आहे. नाशिकच्या विकासाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल,असा हा दिवस आहे. नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्थ असणार आहे. या महाविद्यालयात उच्च शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक दर्जाचे संशोधन आणि आंतराष्ट्रीय दर्जाच्या अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हस्ते संपन्न झाले. यातील ५० जागांसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. सर्वांच्या विशेष प्रयत्नांतून आज हे महाविद्यालय उभे राहिले आहे. आज येथे १७६ विद्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह रूग्णांना मोठा प्रमाणात फायदा होणार असून जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक बळकट होणार आहे. येणाऱ्या काळात वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक सेवा- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सहकार्य केले जाईल. या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण व पदवी संपादन करून विद्यार्थी नक्कीच नाशिकचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी शासनाचे वेळोवेळी मदत व मार्गदर्शन लाभले. येत्या १५ ऑक्टोबरला या महाविद्यालयात पहिली विद्यार्थिंनी प्रविष्ट होत आहे, असे सांगत कुलगुरू डॉ.कानिटकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.