नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे शनिवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ, राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे.
स्त्री शिक्षणाचे जनक, समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहचवून ते रुजविण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले स्मारक उभे करण्याची अनेक वर्षांची महात्मा फुले समता परिषदेची मागणी होती. त्यासाठी समता परिषदेच्या वतीने नाशिक मनपा प्रशासनाकडे वेळीवेळी पाठपुरावा केला. नाशिक महानगरपालिकेकडे संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर अनेक अडचणीचा सामना केल्यानंतर नाशिक शहरातील महापुरुषांचे पुतळे उभे करण्याबाबत नाशिक महानगरपालिकेकडून अर्थसंकल्पात या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली.
मुंबई नाका येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या मंजूरीनंतर मुंबई नाका परिसरात वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने प्रकल्पाचे संकल्पचित्र बनविण्यात आले. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात मनपा आयुक्तासमवेत वेळोवेळी बैठका होऊन या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मुंबई नाका येथील वाहतूक बेटामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे ३३६६ मीटर आकाराचे हे बेट कमी करण्यात येऊन २७१० मीटरवर आणण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक द्वारकाकडे जाण्यासाठी सरळ मार्गिका तयार करण्यात आली. तसेच याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत रित्या होऊन येथील ट्राफिकचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
या स्मारकासाठी संकल्प चित्र तयार करण्यात आल्यानंतर पुतळे उभे किंवा अर्धाकृती करण्यात यावेत यावर विचार विनिमय करण्यात आला. आजवर विविध ठिकाणी उभे पुतळे निर्माण केले गेले आहे. ते अतिशय उंच असल्याने त्याची निगा देखील राखणे कठीण होते. त्यामुळे हे पुतळे अतिशय बोकले वाटावे त्याची व्यवस्थित निगा राखली जावी यादृष्टीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वाधिक उंचीचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुतळ्यांचे काम कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळाकृष्ण पांचाळ यांच्याकडून अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प तयार करण्यात आले. या पुतळयांसाठी भव्य असा चौथरा उभा करण्यासाठी राजस्थान येथून ग्रेनाईट मार्बलचा वापर करण्यात येऊन राजस्थानी कारागिरानी ही वास्तु घडवली. ही वास्तु साकार करण्यासाठी आर्किटेक्ट शाम लोंढे यांनी सल्लागार म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. या स्मारकाचे काम होत असतांना मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी वेळोवेळी पाहणी करत हे काम अतिशय दर्जेदार तसेच ऐतिहासिक कसे होईल याबाबत वेळोवेळी आढावा घेतला.
स्मारकात या विकास कामांचा आहे समावेश……
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात उभारण्यात येत असलेल्या या स्मारकात क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या पुतळ्यांचा समावेश असणार आहे. सुमारे २७१० मीटर जागेवर हे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची १८ फुट तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची उंची १६.५० फुट इतकी आहे. या पुतळयाच्या परिसरात विशेष अशी प्रकाश योजना करण्यात आली आहे. तसेच स्मारकातील विद्युत रोशनाईचा वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये अशी विशेष प्रकाश योजना याठिकाणी करण्यात आली आहे. तसेच या स्मारकात सुसज्ज वाहतून बेट, पाण्याचे कारंजे निर्माण करण्यात येऊन सर्व स्मारक परिसरात गार्डन व सुशोभिकरण करण्यात आले आहे.
असे आहे स्मारकातील शिल्प –
Ø महात्मा फुले १८ फूट, सावित्रीबाई फुले १६.५० फूट
Ø दोन्ही पुतळ्याची रुंदी प्रत्येकी – १४ फूट
Ø महात्मा फुले पुतळा ८ वजन टन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा वजन ७ टन
Ø धातू – ब्रॉन्झ धातू
Ø पुतळ्याची निर्मिती – प्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ
Ø कुडाळ, रत्नागिरी, कोकण येथे निर्मिती
Ø पुतळे बनविण्याचा कालावधी – ११ महिने
Ø पुतळ्यांचा खर्च – ४ कोटी ६८ लक्ष
Ø हा पुतळा अतिशय भक्कम होण्यासाठी ८ फुट कॉंक्रीटचा चौथरा उभा करून त्याला ग्रेनाईट लावण्यात आले आहे. तसेच ३० ते ४० फूट पाईल फाऊंडेशन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे, आमदार किशोर दराडे, आमदार देवायानीताई फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढीकले, आमदार सरोज आहीरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गिते, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रवीण तिदमे, गजानन शेलार, प्रशांत जाधव, सुदाम कोंबडे, सुधाकर बडगुजर, आकाश छाजेड, डॉ.डी.एल.कराड, प्रकाश लोंढे, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्यास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.