नाशिक – नाशिकमध्ये २३ जून पासून दोन दिवसीय सॅनिटरी पॅड निर्मिती प्रशिक्षण शिबिर लेडीज सर्कल इंडिया व प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कार्यालयात होणार आहे.
मासिक पाळी व स्वच्छतेचे महत्व यासंबंधी जनजागृती करण्यासाठी वेशा वस्तीतील महिलांसाठी हा आंतरराष्ट्रीय सेवा प्रकल्प लेडीज सर्कल इंडिया “क्रिमसन” च्या योजनेअंतर्गत नाशिक शहरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सहभागी महिलांना बुधवार व गुरुवार रोजी सॅनिटरी पॅड निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नाशिक लेडीज सर्कल ११९ च्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात येणार असून सुरुवातीपासून सॅनिटरी नॅपकिन बनवण्यास शिकवल्या जातील. मुख्य गोष्ट म्हणजे या सॅनिटरी नॅपकिन उत्पादनात प्लॅस्टिकचा वापर नसून ते जैविक विघटनशील (बायोडिग्रेडेबल) व पर्यावरण पूरक असणार आहे.
या प्रशिक्षणातून रोजगार आणि रोजगाराची शाश्वत साधने उपलब्ध करुन देणे व या महिलांना अधिक सन्माननीय जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण प्रवरा ट्रस्ट कार्यालय, दुसरा मजला, किस्मत बाग, जीपीओ समोर, नाशिक येथे होणार आहे, अशी माहिती नाशिक लेडीज सर्कलच्या सचिव डॉ. शीतल सेठी यांनी दिली आहे.