नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमप्रकरणातून मुलीने आत्महत्या केल्याच्या संशयातून टोळक्याने प्रियकराच्या नातेवाईकांच्या घरात घुसून तोडफोड केल्याची घटना गुलाबवाडी येथील मालधक्का भागात घडली. या घटनेत संतप्त टोळक्याने अनेकांच्या घराचे दरवाजे तोडून नुकसान केले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ दोघांना अटक केली आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार सुनिल राऊत व गणेश गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून प्रज्ञा उघडे, आदित्य भालेराव, बब्या, दिनेश गायकवाड त्यांचे सात ते आठ साथीदार पसार झाले आहेत. याबाबत खैरूनिसा शब्बीर सय्यद (४९ रा.गुलाबवाडी मालधक्का) यांनी फिर्याद दिली आहे.
खैरूनिसा सय्यद यांच्या बहिणीचा मुलगा कलाम मन्सुरी याचेसोबत प्रेमप्रकरण असलेल्या मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याने ही घटना घडल्याचे फर्यादीत म्हटले आहे. गेल्या शनिवारी (दि.३१) व सोमवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. हातातल लाठ्या काठ्यांसह कोयते, प्रहार व हातोडा घेवून आलेल्या संतप्त टोळक्याने सय्यद यांच्यासह नातेवाईकांच्या घराचे दरवाजे तोडून घरात शिरून साहित्याची तोडफोड केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.