नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुन्या वादाची कुरापत काढून एकाने मद्याच्या नशेत दोन बहिणींना मारहाण करीत एकीचा विनयभंग केल्याची घटना स्वारबाबानगर येथील जगतापवाडी भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्की प्रकाश लोंढे (३१ रा.जगतापवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जगतापवाडी भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास लकी किराणा दुकान परिसरात ही घटना घडली. मद्यच्या नशेत असलेल्या संशयिताने कुठलेही कारण नसतांना पीडितेच्या पाळीव कुत्र्यास लाथ मारली. यावेळी महिलेने जाब विचारला असता संशयिताने मागील भांडणाची कुरापत काढून महिलेस शिवीगाळ व मारहाण केली.
या घटनेत महिलेच्या गळयातील सोन्याची पोत तोडून संशयिताने विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला असून यावेळी पीडितेची बहिण तिच्या मदतीला धावून आली असता तिलाही संशयिताने मारहाण केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजू पठाण करीत आहेत.