नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) कोण काय करेल सांगता येत नाही. पोलिसांच्या पतीने असा एक प्रकार केला की सर्वांनाच धक्का बसला. मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या पत्नीचा पोलीस गणवेश पती परिधान करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ड्रेसवर स्वतःच्या नावाची नेमप्लेट लावून बनावट ओळखपत्र बनवून हा पती फिरत होता. या गोष्टीची माहिती पत्नीला कळाल्यानंतर त्यांनीच पती विरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी उज्वला सागर पवार (वय ३७ रा माऊली लॉन्स नाशिक) या मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विवाह २०१७ साली सागर विष्णू पवार यांच्याशी झाला असून त्यांना एक मुलगी आहे.
संशयित हा पोलीस अधिकारी नसताना देखील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत होता. पोलीस गणवेश परिधान करून सोशल मीडियावर पोलीस गणवेश असलेला फोटो अपलोड त्याने केला.
विशेष म्हणजे सपोनि व पोउपनि अशी स्वतःच्या नावाने बनावट नेमप्लेट तयार करून त्याचा वापरही तो करायचा. सरकारी कार्यालय व सामान्य नागरीकांना पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन त्याच्या स्वार्थ व आर्थिक फायदयासाठी लोकांना दमदाटी व धमकावुन फसवत होता. याबाबत फिर्यादी उज्वला पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी विरोध केला असता संशयित आरोपी यांनी त्यांना धमकावत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश टोपले महेंद्र आंबेकर अधिक तपास करीत आहे.