नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आता गोत्यात येणार आहेत. कारण, तत्कालिन संचालकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात सहकार व पणन विभागाने तसे पत्र पाठविले आहे. त्यामुळे तत्कालिन २९ संचालकांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. कारण, त्यात आजी आणि माजी आमदारांचा समावेश आहे.
सहकार विभागाने लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, २०१६-१७ मध्ये नाशिक जिल्हा बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तत्कालिन संचालक मंडळाने ४१७ जणांची भरती केली. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचदरम्यान, बँकेत फर्निचर खरेदी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी, अन्य खरेदी, अनियमित कर्ज वाटपही करण्यात आले. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप तत्कालीन काही संचालकांनीच केला होता. या निर्णयांमुळेच बँक आर्थिक गोत्यात आल्याचे सांगितले गेले. सहकार विभागाने बँकेची चौकशीही केली. या सर्व प्रकारात त्कालिन संचालक मंडळ कारणीभूत असल्याचा आरोप आहे. सध्या बँकेवर प्रशासक नियुक्त आहे. सहकार विभागाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने आता लाचलुचपत विभागाकडे तक्रारी गेल्या आहेत.
बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज आणि सुविधा मिळत नाहीत. संचालकांमुळे बँक आणि पर्यायाने आता शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.