नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’ …या ओळीची आठवण शरद पवार यांनी आज नाशिक दौ-यावर असतांना करुन दिली. वयानुसार थांबले पाहिजे या अजितदादा पवार यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी आताच्या मंत्रीमंडळात ६० ते ७० वयोगटातील लोक आहेत. १९७८ मध्ये मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती त्यांचे नाव मोरारजी देसाई होते. ते पंतप्रधान असताना त्यांचे ८४ वय होते. वय असते… नाही असे नाही… पण केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे करायला वय कधी अडथळे आणत नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी नाशिकला येत असताना वरुणराजाने आपले चांगले स्वागत केले याचा आनंद व्यक्त करतानाच उपस्थित नाशिककरांना पावसाची स्थिती काय आहे अशी विचारणा केली. त्यावेळी पुरेसा पाऊस नाही ही बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी शरद पवार यांनी आम्ही निघाल्यावर पावसाचे थेंब जसे टाकले तसे संबंध जिल्हयात, राज्यात पावसाचा शिडकाव कर आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लाव अशी प्रार्थना वरुणराजाकडे केल्याचे माध्यमांना सांगितले.
नाशिकला स्वातंत्र्याच्या इतिहासात वेगळे महत्व आहे. कॉंग्रेस पक्षाचा इतिहास बघितला तर नाशिकला कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. स्वातंत्र्यानंतर अनेक उत्तम मार्गदर्शक या शहरातून उपलब्ध झाले. त्यावेळी आमच्या तरुणांचे सामाजिक व राजकीय आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण होते. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. चीनचे संकट देशावर आल्यानंतर जवाहरलाल नेहरुंनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी संरक्षण मंत्री म्हणून दिली. चव्हाणसाहेबांचा लोकसभेत प्रवेश हा नाशिकमधून झाला होता. नाशिककरांनी त्यांना अविरत साथ दिली ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात नाशिकमधून करावी वाटल्याने आज दौऱ्याची सुरुवात केल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मी नाशिकला रस्त्यावरून येताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव बघितल्यानंतर आत्मविश्वास वाढला पण त्यापेक्षा माझी भूमिका सामान्य लोकांच्या चेहर्यावर मला पहायला मिळाली त्याचा मला आनंद झाला असेही शरद पवार म्हणाले. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत आपली आवश्यकता असल्याची इच्छा व्यक्त केली आणि मग नाशिकच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर येवल्यातून निवडणूक लढवावी असे सूचवले. येवला आमच्या विचारांचा तालुका आहे. १९८० साली आम्ही कॉंग्रेसमधून बाहेर पडलो. कॉंग्रेस (एस) पक्ष स्थापन केला. त्यावेळी नाशिककरांनी सर्व जागा आम्हाला निवडून दिल्या. लागोपाठ दोनदा जर्नादन पाटील हे निवडून आले होते. त्यामुळे भुजबळसाहेबांना सेफ जागा द्यायची होती म्हणून त्या मतदारसंघातील लोकांची संमती घेतली व आम्हाला यश आले असेही छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघ कसा दिला याचा इतिहास शरद पवार यांनी माध्यमांना सांगितला.