नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांसंदर्भात नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे आहे. मुंडे यांच्या निवडीवरुन भुजबळांना बाजूला करण्यात आले किंवा यात मोठे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. आता यासंदर्भात भुजबळ यांनीच प्रतिक्रीया दिली आहे.
भुजबळ आज माध्यमांशी बोलत होते. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढव्यये होते. आता मात्र उघड बंब माणसं होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. या सोहळ्यावर पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. या धर्मकांड मध्ये सहभागी झालो नाही याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत मोदींनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असा सोहळा राम मंदिर शिव मंदिरात ठीक होता पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता अशी टीका त्यांनी केली.
राज्यातील निवडणूक घेण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की आम्ही निवडणुकीला तयार आहोत. कुठलाही राजकीय पक्ष कायम तयार असतोच. कर्नाटक मध्ये जे पानीपत झाले ते पाहता ते एकत्रित निवडणुकांचे पाऊल उचलतील असे वाटत नाही.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, नाशिकची बँक सर्वात मोठी होती तर देशातील दुसऱ्या नंबरची बँक होती. दिवसाढवळ्या बँक काही लोकांनी लुटली. या बँकेवर प्रशासक येण्यासाठी मी प्रयत्न केला. बँक पूर्व पदावर यायला आणखी वेळ लागेल. आज शेतकऱ्यांना खाजगी बँकांकडे जावे लागते आहे. स्वाहाकारी नेत्यांनी बँकेची वाट लावली. याबाबत जनतेने आवाज उठविला पाहिजे. बँक पूर्वीसारखी होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ नये असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. या निवडीबद्दल ते म्हणाले की, काही लोकांकडून गैरसमज पसरवला जात आहे. एकीकडे पुण्यात शेळकेंना जबबादारी दिली म्हणून अजित पवार यांना बाजूला केले का? असा सवाल करत नवीन लोकांवर जबाबदारी दिली जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पोलिसांनी गुन्हेगारी रोखली पाहिजे. पोलिसांना कोण रोखतंय? असा सवाल उपस्थित करून पोलिसांचा जरब नाहीये. मुंबई पुण्यासारखं नाशिक शहर मोठ नाही. पोलिसांनी गुन्हेगारी कंट्रोल केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
Nashik NCP Politics Chhagan Bhujbal Dhananjay Munde