नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असल्याने पक्षांतराला आता वेग येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील पाच पेक्षा अधिक विद्यमान नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या नगरसेवकांमध्ये तब्बल उपमहापौरांचाही समावेश आहे. आज दुपारी मुंबईत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. त्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत आलेल्या सुनिल बागुल यांची काही दिवसांपूर्वीच पक्षाने बढती केली आहे. त्यांना उपनेते पद देण्यात आले आहे. आता त्याच सुनिल बागुल यांची आई आणि विद्यमान उपमहापौर भिकुबाई बागुल या हातात शिवबंधन बांधणार आहेत. सद्यस्थितीत आई भाजपमध्ये आणि मुलगा शिवसेनेत असे चित्र आहे. आता दोघेही शिवसैनिक होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर थेट उपमहापौरांचेच पक्षांतर होत असल्याने ही बाब भाजपसाठी निवडणुकीत नुकसानदायक ठरु शकते. दोन दिवसांपूर्वीच विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात त्यांनी भाजपचीच पुन्हा सत्ता येईल असा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र, भाजपला गळती लागणार असल्याचे चित्र आहे.
उपमहापौरांपाठोपाठ भाजपचे नगरसेवक शशी जाधव हे सुद्धा शिवसेनेत जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या एका प्रकल्पाचे उदघाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते केले तेव्हाच हे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर भाजपच्या सातपूरमधील विद्यमान नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्या सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच, विद्यमान नगरसेवक विशाल संगमनेरे आणि पल्लवी पाटील हे सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. या विद्यमान नगरसेवकांबरोबरच काही माजी नगरसेवक आणि भाजप व अन्य पक्षातील नेते आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याची पहिली झलक आज पहायला मिळणार असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. परिणामी, आगामी निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.