नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील पोखरी या गावातील दर्शन शिंदे या युवकाच्या शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे त्याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. आपल्या मागण्यांसह प्रशासनाच्या कारभाराविरोधातील हे आंदोलन स्वातंत्र्य दिनी झाल्याने त्याविषयी चर्चा रंगत आहे.
ग्रामसेविका एस. एस. गडाख यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात दर्शन शिंदे या युवकानं पंचायत समिती कार्यालया शेजारील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. या गावातील ग्रामसेविका या मुख्यालयी रहात नाहीत. दलीत वस्ती अंर्तगत कामे न करताही बिले काढली गेली. ग्रामसभा फक्त कागदोपत्री दाखविली जाते. माहितीच्या अधिकारात माहिती मिळत नाही. म्हणून दर्शन शिंदे या युवकाने पंचायत समितीकडे अर्ज करून माहिती मागविली होती. परंतू त्याला कार्यालयाकडून माहिती दिली गेली नाही. सोमवारी दर्शन याने पंचायत समितीमध्ये जावून आपण १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर त्याने हे आंदोलन करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दर्शन शिंदे या युवकाने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. तहसिल कार्यालयातील झेडांवंदन आटोपताच या युवकाने टाकीवर चढून घोषणा देण्यास सुरुवात केली. तेव्हा प्रशासन जागे झाले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी, हवालदार दत्ता सोनवणे यांनी त्वरीत आंदोलनकर्ता दर्शन शिंदे याच्याशी फोन वरून संपर्क साधला.
यावेळी प्रशासन विकास अधिकारी संदीप दऴवी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी देविदास मांडवडे, विस्तार अधिकारी विजय ढवऴे हे उपस्थितीत होते. एक ते दीड तास आंदोलन चालू होते. ग्रामसेविका गडाख यांना समक्ष समोर बोलविण्याची मागणी आंदोलक शिंदे करीत होता. शेवटी पो. नि. चौधरी यांनी पंचायत समिती प्रशासनाला सांगितले. त्यानंतर गडाख यांच्याशी पो. नि.चौधरी यांनी स्वतः फोनवरून चर्चा करून त्वरीत बोलाविले. ग्रामसेविका तेथे आल्यानंतर शिंदे या युवकाने शोले स्टाईल आंदोलन मागे घेतले.
पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी व त्याचे सहकारी पोलिस हवालदार दत्ता सोनवणे, पोलिस मित्र किरण जाधव कपिल तेलुरे यांनी आंदोलनकर्ता दर्शन शिंदे यांची समजुत काढली. यावेळी आंदोलनकर्ता दर्शन शिंदे यांना १५ दिवसात कारवाई करु असे लेखी आश्वासन देण्यात आले.
Sholay style movement in Nandgaon Nashik Nandgaon Shole Style Agitation Youth Demands District Rural