नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव येथे जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा मंजूर करण्यात आला असून ८ एप्रिल पासून ती सेवा पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केले होते. त्यात जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव येथील थांबा रद्दचा समावेश होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे प्रवाश्यांची होणारी गैरसोय विचारात घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव येथील थांबा मंजूर करण्याबाबत मागणी केली होती. त्यावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वे प्रशासनास सदरच्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार विवेक कुमार सिन्हा, संयुक्त निदेशक रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांनी त्याबाबतचे आदेश निर्गमित केले असून ८ एप्रिल २०२३ पासून या थांब्यांवर वरील रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
पटणा लोकमान्य टिळक जनता एक्सप्रेस (१३२०१/०२), लोकमान्य टिळक बनारस एक्सप्रेस (११०७१/७२) व लोकमान्य टिळक गोरखपुर कामयानी एक्सप्रेस (२२५३७/३८) या रेल्वे गाड्यांचे नांदगाव येथील थांबे रद्द केल्याने नियमितपणे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेवून कोरोना काळात नांदगाव येथील रद्द करण्यात आलेले रेल्वे थांबे ८ एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.
“सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण या त्रिसुत्री मुलमंत्रानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे सेवा अधिक सुखर केल्याबद्दल आभार मानते. प्रवासी संख्या विचारात घेऊन प्रायोगिक तत्वावर रेल्वे थांबे मंजूर केले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी नियमित संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.