नांदगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – या वर्षातील पहिली शनी अमावस्या आज आहे. शनी अमावस्ये निमित्त साडेतीन पीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या नस्तनपूर येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला आहे.
सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे. आजची अमावस्या दर्श अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या असे म्हणतात. आज सकाळी ९ वाजू ११ मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ झाला आहे. ही अमावस्या उद्या, रविवार, १८ जून रोजी सकाळी १० वाजून ६ मिनिटांपर्यंत असणार आहे. शनि अमावस्येच्या दिवशी भगवान शनि देवाचे दर्शन घेण्याला भाविक प्राधान्य देतात.
साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या नाशिक जिल्हयातील नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर येथे आज शनी अमावस्ये निमित्ताने लाखो शनिभक्त दर्शनासाठी गर्दी करतात. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या व साडेतीन शनी पिठापैकी एक असलेले संपूर्ण पीठ श्री.क्षेत्र नस्तनपुर ( ता.नांदगाव ) येथे आहे. प्रभू रामचंद्र सीतामाईंच्या शोधात निघालेले असतांना प्रांतकाळी स्नानानंतर सूर्याला अर्ध्य देतांना येथील शनी देवाची वालुकामय मूर्ती प्रभू रामचंद्रांच्या हाती लागली. त्यानंतर श्री.क्षेत्र नस्तनपूर ( ता.नांदगाव ) येथे या मूर्तीची स्थापना करण्यात आली असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे लाखो भाविक शनी अमावस्येला येथे दर्शनासाठी येत असतात.अमावस्या कालावधीत शनीदेवाचे दर्शन घेतल्याने शनीदेवाची कृपाद्रुष्टी लाभते अशी धारणा असल्याने अमावस्या कालावधीत दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.