नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधार ईनेबल पेमेंट सिस्टीमचा वापर करुन नांदगाव तालुक्यातील दोन गावातील नागरीकांच्या बँक खात्यांतून परस्पर रक्कम काढल्याचे समोर आले आहे. १५ ग्रामस्थाच्या बँक खात्यातून आधार ईनेबल पेमेंट सिस्टीम सेटर येथून अंगठ्याच्या ठश्याद्वारे परस्पर ऑनलाईन २ लाख ६६ हजार ७९९ रूपयांची रोकड काढण्यात आले. पोलिस तपासात आधारकार्ड अपडेशन कॅम्पच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले. पोलिसांनी चाळीसगाव गाठून तिघांना ताब्यात घेतले असता या घटनेचा उलगडा झाला.
ग्रामिण पोलिसांच्या सायबर पोलिसांनी चाळीसगाव (जि. जळगाव) येथील या भामट्यांना हुडकून काढले असून, त्यात आधार केंद्रात काम करणा-या दोघांसह एका संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याचा समावेश आहे. किशोर लक्ष्मण सोनवणे (२१ रा. उपखेडा ता. चाळीसगाव), रविंद्र विजय गोपाळ (२३) व सोमनाथ काकासाहेब भोंगाळ (२३ रा. दोघे रा. बानगाव ता. चाळीसगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. नांदगाव व वेहळगाव ता.नांदगाव येथील सुमारे १५ हून अधिक बँक खातेदारांच्या अकाऊंट मधील रकमा अचानक काढल्या गेल्या होत्या. संबधीतांनी याबाबत वेहळगाव येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत जावून चौकशी केली मात्र अपेक्षित उत्तर न मिळाल्याने सदर व्यक्तींनी आडगाव येथील ग्रामिण पोलिस दलाचे कार्यालय गाठून अधिक्षक शहाजी उमाप यांची भेट घेतल्याने या घटनेचा उलगडा झाला आहे.
उमाप यांच्या आदेशाने व समाधान संजय घुगे (रा.पळाशी ता.नांदगाव) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक देसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
किशोर सोनवणे हा संशयित प्रधानमंत्री ग्रामिण डिजीटल साक्षरता अभियान अंतर्गत ऑनलाईन परिक्षांचे रजिस्ट्रेशन फार्म भरण्याचे काम करत होता. सध्या तो धुळे येथे कम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. तर त्याचे दोन साथीदार चाळीसगाव येथील आधार केंद्रावर काम करतात. जानेवारी २०२३ मध्ये संशयितांनी नांदगाव तालुक्यातील पळाशी व वेहळगाव येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्प घेतला होता. या कॅम्पमध्ये संशयितांनी नागरीकांचे बायोमॅट्रीक फिंगर स्कॅनरद्वारे अंगठ्यांचे ठसे घेतले होते. संशयितांनी या ठश्यांचा डाटा संकलीत करून त्याद्वारे सीएससी डीजीपे ऑनलाईन मनी ट्रान्सफर सर्व्हीस अॅपमध्ये नागरीकांच्या ठश्याचा वापर करन संबधीताचे बँक खात्यावरून परस्पर पैसे काढून घेतले असल्याची कबुली दिली आहे. संशयितांच्या ताब्यातून लॅपटॉप, मोबाईल फोन, फिंगर स्कॅनर मशिन, आयरीस मशिन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर त्रिकुटाने अलिशान जीवन व मौज मजेसाठी हा उद्योग केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयितांच्या अटकेने अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या कारवाईची दखल घेत पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास दहा हजार रूपयांचे बक्षीस जाहिर केले आहे. ही कारवाई निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुनिल पाटील, सारिका चौधरी, उपनिरीक्षक दिपक देसले, हवालदार बिपीन चौधरी, पोलिस नाईक प्रमोद जाधव, परिक्षीत निकम,चालक डी.बी.बागुल, नितीन करंडे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, सुनिल धोकट, आकाश अंबोरे, तुषार खालकर, माधूरी जाधव आदींच्या पथकाने केली.