नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुचर्चित नवी प्रभाग रचना अखेर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक याच नव्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यामुळे नाशिककरांसह राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक या साऱ्यांचे लक्ष या प्रभाग रचनेकडे लागले होते.
या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा नाशिक महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालांच्या ठिकाणी (सातपूर, पंचवटी, नाशिक पश्चिम, नाशिकरोड, सिडको, नाशिकपूर्व) उपलब्ध झाला आहे. तसेच, नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवरही हा आराखडा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी प्रथमत आराखडा प्रसिद्ध झाल्याने त्याची मोठी उत्सुकता सर्वांमध्ये आहे. प्रभागनिहाय नकाशे, त्यात समाविष्ट होणारा परिसर हे सर्व आराखड्यात नमूद करण्यात आले आहेत.
नाशिक महापालिकेत विद्यमान १२२ नगरसेवक आहेत. मात्र, राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार आता नाशिक महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ही संख्या आता १३३ होणार आहे. गेल्या निवडणुकीत ४ नगरसेवकांचा एक प्रभाग करण्यात आला. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता त्रिसदस्यीय प्रभाग असणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात ३ नगरसेवक असलेले ४३ प्रभाग असतील तर १ प्रभाग हा ४ नगरसेवकांचा राहणार आहे.
आराखडा व नकाशे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://nmc.gov.in/home/getfrontpage/187